पुणे ः राज्यभरात निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक ठिकाणी तपासामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड सापडत आहे. अशातच मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये काल (सोमवारी) पुन्हा एकदा रोकड सापडल्याने खळबळ उडाली. देहूरोड परिसरात एका फॉर्च्युन गाडीत 3 लाख 20 हजार रुपये आढळून आले. विवेक काळोखे आणि सागर बसे हे दोघे पैसे वाटप करायला आलेत, अशी तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी गाडीची तपासणी केल्यावर ही रोख रक्कम आढळली. मात्र गाडीत कोणत्याच पक्षाशी संबंधित चिन्ह अथवा वस्तू आढलेल्या नाहीत. त्यामुळं ही रक्कम कोणाची आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप ही कोणता खुलासा केलेला नाही. काळोखे आणि बसे दोघे ही बांधकाम व्यावसायिक आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळं या दोघांना समजपत्र देऊन, ही रक्कम शासनाकडे जमा करून घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. रविवारी सुद्धा सचिन मुर्हे या बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यलयात 36 लाख 90 हजारांची रोकड आढळली, त्यानंतर घरी जाऊन तपासणी करण्यात आली. तर घरी सुद्धा 15 लाखांची रोकड सापडली.
Tags
राज्य